बुधवार, ९ नोव्हेंबर, २०१६

फुल्ली फालतू ! ( भाग - ४ )





    काल रात्री युट्युबवर सनी देओलची आप की अदालत मधील घायलच्या दुसऱ्या भागाच्या प्रमोशनसाठी चाललेली मुलाखत बघत होतो. नेहमीप्रमाणे मुलाखत कर्त्याचे व मुलाखत देणाऱ्याचे पूर्वनियोजित तिखे सवाल और बेबाक जबाबचा खेळ आणि जज म्हणून दलेर मेहंदीचे शोपीस प्रमाणे बसणं यापलीकडे काही नव्हतं. ज्या प्रश्नांची उत्तरं देणं सनीला जड जात होतं तिथं तो हसून वेळ मारून नेत होता. पण यावरून मुलाखत पूर्वनियोजित नव्हती असं म्हणता येत नाही. पण या निमित्ताने काही गोष्टींची आठवण झाली.


    पंजाबातून तसे बरेच कलाकार हिंदी फिल्म इंडस्ट्रीत आले. किंबहुना बॉलीवूडचा पाया म्हणजे हे पंजाबी असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. गायक, संगीतकार, गीतकार, अभिनेते, निर्माते वगैरे वगैरे. इंडस्ट्रीत बव्हंशी मंडळी पंजाबी तरी आहेत किंवा पंजाब धार्जिण ! म्हणजे मराठी माणसागत ओढून ताणून हिंदी बनणारे.


    तर मी काय म्हणत होतो, सनी देओल व पंजाब या कॉम्बिनेशन वरून काही गोष्टींची आठवण झाली तर काही नव्याने लक्षात आल्या.


    पंजाब दा पुत्तर वा शेर या एका लेबलाखाली देओल मंडळी अलीकडच्या काळात कशीबशी तग धरून राहिली. तसं बघितलं तर लेबलखाली जगणारे, वावरणारे बरेच आहेत. काहींनी स्वप्रयत्ने हे लेबल / इमेज प्राप्त केली तर काहींना मिडीयाने मिळवून दिली तर कुठे दोहोंचा संगम घडून आला.


    उदाहरणार्थ, ज्यावेळी हिरो नाचत नव्हते तेव्हा मिथुन चक्रवर्ती डान्स आयकॉन होता. आता मिथुनचे जुने पिक्चर पाहिले तर त्याने गाण्यांमध्ये जे काही केलंय त्याला डान्स कसं काय म्हणता येईल हा जरी प्रश्न असला तरी त्याच काळातील हिरोंचे नृत्यकाम (?) पाहिल्यावर मिथुन हा नृत्य सम्राट ठरावा.


    तीच गोष्ट हिमॅन धरमिंदरची ! तसं बघितलं तर हा काही बॉलीवूडचा पहिला अॅक्शन हिरो नाही. इतिहास बघितला तर अॅक्शन हिरोची परंपरा पार अशोक कुमार, भगवानदादाच्याही आधी सुरु झाल्याचे दिसून येईल. पण व्यवस्थित बॉडी बिडी असलेला हाच पहिला व एकमेव ! नाही म्हणायला दारासिंगही होता पण त्याचा उपयोग आपल्या लोकांनी जीप, ट्रक, विमान वगैरे खेचण्यासाठीच केला. असो.


    धर्मेंद्रची हिमॅन इमेज आत्ता आतापर्यंत म्हणजे बॉबी न् सनी टप्प्याटप्प्याने बेरोजगार होईपर्यंत कायम होती. तो मेन रोल मध्ये यायचा. जरूर तिथे डुप्लिकेट वापरायचा. काही ठिकाणी तर डबिंग आर्टिस्टही त्याने वापरल्याचे दिसून येते. पण फिल्ममध्ये तो जवळपास हिरोच्याच रोलमध्ये असायचा. भलेही मग नायिका का नसेना !


    पूर्वी मला एक प्रश्न सारखा पडायचा व तो म्हणजे देव आनंद व धर्मेंद्र यांना पिक्चर मिळतातच कसे ? पण देवच्या एक्झिटमुळे आता हा प्रश्नच पडायचा बंद झालाय. व अर्थशास्त्राचे थोडेफार ज्ञान प्राप्त झाल्यावर बॉलीवूडचे टुकार पिक्चर देखील इथल्या बेरोजगारीला आळा घालण्यास कसे उपयुक्त आहेत याची जाणीव झालीय.


    तर आपण हिरोंच्या इमेजबद्दल बोलत होतो. नाना पाटेकर ! क्रांतीवीरच्या आधीही नाना पाटेकर होताच पण हिंदी सिनेमाला तोवर तो काहीसा अज्ञातच राहिला. परिंदा मधला त्याचा तो व्हिलनचा रोल माधुरी - अनिलच्या सेक्स सीनपेक्षा जास्त लक्षात राहणारा, अजरामर संज्ञेत मोडणारा असला व ऋषी कपूर सोबतचा हम दोनों, त्या इमेजला छेदणारा जरी असला तरी क्रांतीवीरमुळे एक नवा अँग्री यंग मॅन / बडबोला हिरो जन्माला आला. पुढे त्याची बडबड इतकी वाढली कि कोहराम मध्ये आयेशा जुल्का असूनही तो बघवला नाही व यशवंत मध्ये तर तो पूर्णतः डोक्यातच गेला.


    पण नानाची बडबड फक्त पडद्यापुरती सीमित राहिली नाही. मराठी मिडीयाने त्याचा फटकळपणा कॅश करण्याचा आटोकाट प्रयत्न केला व अजूनही करत आहे. ठाकरे बंधू वेगळे झाले,बोला नाना पाटेकर. मोदींनी अमकं धोरण जाहीर केलं, बोलवा नाना पाटेकरला. भारत - पाकिस्तान क्रिकेट असो वा राजकारण, बोलिए नाना पाटेकर ! मग नानाही आपल्या लौकिकी फटकळपणाला जागत बोलायला मोकळा.


    आत्ता अलीकडे नानाच्या तथाकथित फटकळपणाचे केविलवाणे रूपही पाहिलं. निमित्त होतं पाकिस्तानी कलाकारांवरील बंदी विषयी सलमानचं मत व पत्रकार नानाला याविषयी छेडत होते. नाना नाव न घेता आपलं स्टेटमेंट देत होता. पण शेवटी शेवटी मिडीयाचा आगाऊपणा एवढा वाढला कि, नानाच वैतागून गेला व त्याने थेट विचारलं कि, मी कुणाचं नाव घेऊन बोलू म्हणता ?


    पडद्यावरील नानाची इमेज तसेच मिडीयाने क्रीएट केलेला त्याचा लौकिक पाहता त्याची हि अगतिकता विसंगत वाटत होती. पण कदाचित हेच खरे चित्र असू शकेल. तसेच मिडीयाचा प्रभाव, दबाव काय असतो याचीही हि एक झलक आहेच.


    पडद्यावरील लौकिक इमेज नसलेले पण तरीही आपला आब राखून असलेलेही काही नग आहेत. उदाहरणार्थ, जितेंद्र !


    जितेंद्रच्या विशिष्ट डान्स शैलीने त्यांस जम्पिंग जॅक पदवी मिळाली पण एव्हरग्रीन देव आनंदपेक्षा सर्वाधिक काळ नसला तरी डोक्यात न जाता तोच हिरोची भूमिका करू शकला. त्याच्या आधीचे, बरोबरचे व नंतरचे चरित्र भूमिकांत गेले. पण हा राजश्री ते माधुरी पर्यंत कार्यरत राहिला. तसं पाहिलं तर माधुरीने आपल्या स्ट्रगल पिरेड मध्ये बऱ्याच थकल्या - भागल्यांना हात दिला. जसे कि विनोद खन्ना ! पण तो वेगळा विषय आहे.


    जितेंद्र प्रमाणेच चिरतारुण्याचा वर मिळालेले डॅनी, नाना पाटेकर देखील आहेत. या दोघांना अपवाद वगळता मेन रोल क्वचितच मिळाले. पण इतकी वर्षं कार्यरत असूनही यांना थकलेले वा म्हातारे म्हणणं जड जातं. डॅनीचा शेवटचा पाहिलेला सिनेमा चायना गेट. त्यातली बरीचशी मंडळी त्याच्या वयाची नसली तरी जवळपासची होतीच. पण नसीर, ममता व उर्मिला सोडलं तर डॅनी प्रमाणे तरुण कोणीच दिसत नव्हतं. अगदी ममताच्या नायकाची भूमिअक करणारा समीर सोनीही डॅनीपुढे वयस्कच दिसत होता.


    तीच गोष्ट नाना पाटेकरच्या वेलकम पार्ट टू ची. परेश रावल, अनिल कपूर व जॉन अब्राहम. तिघांच्या तुलनेनं नाना वयस्क वाटत नाही. अगदी क्रांतीवीर मधील त्याची नायिका बनलेली डिम्पलही यात आजीबाई दिसून येते. नटसम्राटमध्येही केवळ पांढरा रंग केसांना फासलाय म्हणून. नाहीतर नाना तरुण आहे अजुनी !


    त्याउलट किंग खान वीर जारा मध्येच बेक्कार दिसत होता. गोविंदाने वय लपवण्यासाठी सर्व काही केले. अगदी हंसिका मोटवानीचा नायक बनूनही उभा राहिला. मगर उम्र कि मार उसके हर मूव्हमेंट में दिख रहेली थी. सिवाय उसके डान्स के !

     डान्समध्येही एक्स्प्रेशन दाखवणारा हा बहुधा  अखेरचा अभिनेता ! आता सारी कवायतच चाललीय. प्रभुदेवा तर डान्सच्या नावाखाली वाटेल ते खपवू लागलाय. असो. तर अशा ह्या लौकिकी इमेज असलेल्या अभिनेत्यांच्या कथा. आपल्या गप्पा अशाच चालू राहतील. भेटू परत दुसऱ्या भागात. तोपर्यंत अलविदा !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा