शनिवार, ५ सप्टेंबर, २०१५

माणसाचा देव





    दिवस सणांचे. उत्साहाचे आणि दुःखाचेही. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर गणपती येत आहेत. यानिमित्ताने आस्तिक – नास्तिक, प्रतिगामी – पुरोगामी – सनातनी पंथीय मंडळी वादांची धुळवड खेळतील याबद्दल माझ्या मनात अजिबात शंका नाही. तसेही महाराष्ट्राला वादाचे वावडेही नाही वा नाविन्य. पण खंत एका गोष्टीची वाटते कि, वादातून निष्पन्न काहीही न होता लोकांचे क्षणिक मनोरंजन मात्र होते. असो, जगाची चिंता आपण का करावी असे म्हणत मी आता मुख्य विषयाकडे वळतो.

    कोणताही सण तोंडावर आला कि त्यानिमित्त होणाऱ्या उधळपट्टीची चर्चा हि अनिवार्य असते व यंदाही हा क्रम पाळला जाणार यात शंका नाही. दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी गणेशोत्सव मंडळांनीही पुढाकार घ्यावा असेही आवाहन केले जात आहे. या आवाहनांना मंडळं अनुकूल प्रतिसाद देतीलही. परंतु या मंडळांपेक्षा भाविकांची व त्यांच्या देणग्यांची चर्चा मला महत्त्वाची वाटते.
देवाने सर्व सृष्टी बनवली. यात मग सजीव – निर्जीव दोन्ही प्रकारचे घटक आले, अशी भाविकांची श्रद्धा आहे तशीच माझीही. देवाने आपल्याला निर्माण केले हे जर सर्वमान्य आहे तर त्याला अमुकच गोष्ट वा वस्तू दिली असता तो प्रसन्न होईल असा निरर्थक आशावाद आपण मनात का बाळगतो ?

    दगड काय, सोनं काय किंवा तत्सम धातू काय. परमेश्वराला सर्व सारखेच. त्याच्या लेखी यांना किंमत काय ? मुळात या गोष्टी आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत. सोने – चांदी आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा असल्याने आपल्या लेखी ते अमुल्य. पण देवाची अर्थव्यवस्था काय या सोन्या – चांदीवर अवलंबून आहे ? नाही ना. तरीही सोन्याची – चांदीची आभूषणं त्यांस अर्पण करण्यात आपण नेमकं काय साधतो ?

    आज मी भारतात आहे म्हणून देवाला नवस करताना ‘ अमुक इतक्या रुपयांची वस्तू तुला अर्पण करेन ‘ असं म्हणेन. पण तेच जर मी इतर देशात असताना म्हटलं व रुपयाच्या जागी त्या देशातील प्रचलित चलनाचे नाव घेतले तर .... ? देश, चलन हि संकल्पना देवाने बनवलेली आहे का ? त्याला भाषेचं बंधन आहे का ? या प्रश्नांचा कधीतरी विचार करायलाच पाहिजे.

    मला पेढे आवडतात म्हणून मी कोणत्याही देवाला नवस करताना ‘ तुला पेढे अर्पण करेन, माझं काम होऊ दे ‘ असं म्हणेन. काम होताच मी ते पेढे देईन. पण खाणार कोण ? प्रसाद म्हणून ते भाविकांत वाटले जाणार. देव तर प्रत्यक्ष नाही खाणार. पण जेव्हा आपण अर्पण केलेला पदार्थ इतरांच्या हाती प्रसाद रूपाने जातो तेव्हा वाटणारा आनंद, समाधान अवर्णनीय असले तरी यांमुळे खरोखरच देवाला तो पदार्थ पोचल्याची पोचपावती आपल्याला मिळते का ? 

    जर इतरांना प्रसादरूपाने खाद्यपदार्थ वाटण्यात आपल्याला आनंद मिळतो, संधान मिळते व कोणाचा तरी अंतरात्मा त्यामुळे सुखावला जाऊन ते देवाला मिळाले अशी आपण मनोमन समजूत करून घेतो तर मग आपल्या देवाचे अस्तित्व नेमकं कुठे आहे, हे आपल्याला माहिती असूनही आपण इतरत्र का भटकतो ?

    देवाच्या मूर्तीला नमस्कार केला नाही, प्रसाद घेतला नाही तर त्याचा कोप होतो. तो शिक्षा करतो असे सांगतात. मग त्याला नमस्कार करू न देणारे व प्रसंगी प्रसाद वाटपात हात आखडता घेणाऱ्यांना देव काय शिक्षा करतो बरे ? त्या विषयीच्या कथा कुठे आहेत ? पुराणे लिहिली आहेत का ?

    कोणी काहीही कथारूपाने लिहिल्याने अथवा सांगितल्याने आपण त्याचे पालन करावे इतकेही काही आपण निर्बुद्ध प्राणी नाही. तसं असतं तर अश्मयुगापासून आजवर आपण प्रगती – अधोगती साधली नसती. हजारो वर्षांच्या कालचक्रात इतर प्राण्यांप्रमाणे आपणही नामशेष झालो असतो.  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा