सोमवार, २८ सप्टेंबर, २०१५

संजय म्हणाला ..... ! ( भाग – ६ )





    अलीकडे धर्म - संस्कृती रक्षकांनी बराच जोर धरल्याचे दिसून येते. यामागे अराजकीय संघटनेच्या राजकीय उपसंघटनेचे केंद्र व राज्य सरकारात निवडून येणे, हे प्रमुख कारण मानले जात असले तरी ते पूर्णतः खरे नाही. धर्म – संस्कृती रक्षक मंडळं पूर्वीही होती व आजही आहेत. फरक इतकाच कि संपर्क माध्यमांनी ती वारंवार आपल्या नजरेसमोर येऊन धडकत असल्याने ‘ आत्ताच यांचे पेव कसं फुटलं ? ‘ हा प्रश्न आपल्याला पडून राहतो.

    या सर्व धर्म – संस्कृती रक्षकांची देखील एक मौज आहे. यांना ना धर्म माहिती असतो ना संस्कृती. मग कशाचे रक्षण करायचे वा का करतात, ते त्यांनाच ठाऊक. त्यात आणखी जोडीला देवालाही आणून बसवतात. प्रत्यक्षात देव, धर्म व संस्कृती हे तिन्ही प्रकार परस्परांहून अधिक भिन्न आहेत. इतके कि, यांच्यातील साम्य शोधू पाहता फार कमी साम्यस्थळं आढळून येतील. वा कदाचित एकही नाही.

    प्रथम आपण देवाचं उदाहरण पाहू. तुम्ही मूर्तिपूजक आहात / नाही हा प्रश्न थोडा बाजूला ठेवू. तुम्ही देव मानता ना, मग त्या देवाला तुम्ही कधी पाहिलंय, अनुभवलंय का ?

    एक जन्मतः अंध व्यक्ती ज्याप्रमाणे आपल्या कल्पनाविश्वात काही प्रतीकं निर्माण करून त्यांच्या सहाय्याने आपली वाटचाल सुरु ठेवते, तद्वत आपलं चाललेलं आहे. कोणता देव कसा दिसतो, काय खातो – पितो हे आपल्याला मुळीच माहिती नाही. फक्त देव म्हणजे सर्वशक्तिमान, आपल्यापेक्षा श्रेष्ठ. तेव्हा आपल्याहून त्याचं सर्वच वेगळं असणार असं गृहीत धरून आपण त्याची रचना केली. मग ती मूर्त असो वा अमूर्त !

    या कल्पनाविश्वाला वास्तवाची जोड देण्यासाठी मग आपल्या दृष्टीने मौल्यवान असलेले धातू, वस्त्रं, खाद्यपदार्थ त्याला अर्पण केले जातात. तसं बघायला गेलं तर आदिम मनुष्याची देवभक्ती व आत्ताची आपली देवभक्ती यांत काडीचाही फरक नाही. तो देवाच्या भीतीने, सुखाने जगण्याच्या लालसेने देवपूजा करायचा. आपणही तेच करतोय. फक्त संदर्भ बदलले आहेत. आता हि पूजा कशी करायची ? तर सर्वांत उत्तम व सर्वत्र जे उपलब्ध आहे ते देवाला अर्पण करायचं. आता हल्ली महागड्या वस्तू देवाला अर्पण करण्याची फॅशन निघाली आहे, पण त्या बद्दल न लिहिलेलंच बरं !

    देवाच्या या सर्व पूजा प्रकरणात धर्म वा संस्कृतीचा संबंध सहसा येत नाही. इथे फक्त श्रद्धा व भाविकतेचा संबंध येतो. मग देवाचे रक्षण धर्म – संस्कृती रक्षक कसे करतात ? किंबहुना त्याची गरज आहे का ?

    धर्म म्हणजे काय आहे ? तर धर्म म्हणजे माणसानं कसं राहावं, वागावं, बोलावं यांची नियमावली. शाळा – कॉलेजातही अशी नियमावली असते. त्या नियमावलीचे आपण काय करतो ? धर्माचेही तसंच करायला पाहिजे. पण तसं होत नाही. यामागील कारण काय असावं ?

    संस्कृतीमध्ये माणसाची खाद्य, वस्त्र, आभूषण इ. घटकांचा अंतर्भाव होतो. एका समुहात परिस्थितीनुसार वा विशिष्ट काळात / परिस्थितीत कोणी काय खावं अथवा खाऊ नये असं नियमन केलं तर ती त्या समूहाची संस्कृती होते. धर्म नाही. एखाद्या समूहाने विशिष्ट वस्त्रं परिधान करण्याचा नियम बनवला व तो अंमलात आणला गेला तर ती त्याची संस्कृती होते. धर्म नाही. मग अशा संस्कृतीची धर्मासोबत गाठ का बांधली जाते ?

    देव, धर्म, संस्कृती यांपैकी धर्म हि संस्था अपवाद केल्यास देव, संस्कृती हे प्रवाही आहेत. निसर्ग प्रतीकांत असलेला देव मूर्तीस्वरूपात आला. आता फोटोंचे युग आहे. पुढचे माहिती नाही. पण बदल आहे.

    संस्कृतीचे म्हणाल तर शरीरसौंदर्याकरता घातले जाणारे अलंकार म्हणून वस्त्रांचा वापर करण्यात येऊन आता ते मानवी जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे. त्यातही आणखी इतके विविध प्रकार आहेत कि, एकाच वस्त्राचा आभूषण, शरीरसंरक्षक म्हणूनही वापर करता येतो. यात अजूनही बदल होत जातील. शिवाय वस्त्रांची निर्मिती होण्याआधी इतरही अनेक वस्तू परिधान करण्याची परंपरा होती व आजही आहे. जे वस्त्रांचे, तेच खाद्याचे !

    बदलत्या काळानुसार खाद्यजीवनही बदलत गेले. पूर्वी अज्ञात असलेला झाडपाला, फळे आता भाज्या म्हणून सर्रास वापरात आणल्या जातात. मांसान्नाचेही तेच ! यामध्ये बदल होतात. नाही असे नाही. विशिष्ट पदार्थांच्या निर्मिती / उत्पादनाचा तुटवडा पडला कि, त्याच्या जागी पर्यायी पदार्थाची आपोआप योजना होतेच. मिळून संस्कृती ही प्रवाही आहे निश्चित ! तिला बंधन नाही. मग अशा प्रवाही देव, संस्कृतीला नेमका कशाचा धोका आहे ? नेमकं कशापासून यांचं संरक्षण करण्याचे वारंवार आवाहन केले जाते ?

    समूह जीवनाचे नियमन करण्यासाठी जी संस्था बनवण्यात आली --- त्या धर्मसंस्थेच्या चालकांनी, अनुयायांनी मोठ्या कुशलतेने देव अन् संस्कृतीशी धर्माची सांगड घालून खरेतर देव, संस्कृतीला धर्माशी जखडून घेत त्यांचे स्वतंत्र अस्तित्व संपवत त्यांच्या अपहरणाचा प्रयत्न केला. जो आजही सुरु आहे व पुढेही राहील. यामागील मुख्य कारण म्हणजे धर्म संस्थेचा स्वार्थ !

    आजच्या काळात राज्यघटना प्रकार उदयास आल्याने अलिखित धर्माच्या घटनेला तशीही किंमत नाही, हि गोष्ट धर्मचालकांना चांगलीच माहिती असल्याने त्यांनी पूर्वीपेक्षाही अधिक अशी धर्माची देव – संस्कृतीशी सांगड घालण्याचा निकराने प्रयत्न चालवलाय. यामुळे राज्यघटना उपलब्ध असूनही धर्मामुळे तिला कसलीच किंमत नसल्याचे वास्तव आहे. धर्माला हे बळ कोणी दिले ? तर देव अन् संस्कृती या दोन घटकांनी ! हे दोन्ही विषय माणसाच्या जिव्हाळ्याचे आहेत. यांचेच अपहरण करत धर्मसंस्था आपलं बळ वाढवत होत्या, आहेत व राहतील.

    उदाहरणार्थ, अल्लाने सर्व जगाची निर्मिती केली. इथपर्यंत मान्य. मग त्या अल्लाला सर्वांनी मानलंच पाहिजे व मोहम्मदला प्रेषित मानलंच पाहिजे हा आग्रह का ? देव म्हणून अल्लाचे अस्तित्व मान्य. पण त्यालाच माना व मोहम्मदला प्रेषित माना हे धर्मसंस्थेचं मानवी जीवनावर अतिरेकी आक्रमण. त्याहीपुढे धर्मसंस्था सांगेल तेच खायचं, परिधान करायचं. म्हणजे संस्कृतीही गेली धर्माच्या खड्ड्यात !

    हेच उदाहरण हिंदू, ख्रिश्चन आणि इतर धर्मियांना देखील लागू पडते. हिंदूंच्या कोणत्याही देवाने वा देवभक्ताने कसं वागायचं वा कोणाला माना / ना मानायचं सांगितलं नाही. हे कार्य धर्मसंस्थेने आपल्या हाती घेतलं. पाठोपाठ त्यांनी काय खावं – प्यावं तसंच काय परिधान करावं यावरही निर्बंध आणण्याचे प्रयत्न केले. परंतु देश मोठा. संपर्कसाधनांचा अभाव. यांमुळे निर्बंध सर्वांना सारखेच लागू न पडता त्यांस मर्यादा येऊन संस्कृती वैचित्र्य / वैविध्य मात्र निर्माण झाले. अर्थात, हे इथंच घडलं असेही नाही. इस्लाम वा ख्रिस्ती धर्म – संस्कृतीतही हेच घडून आल्याचं आपणांस दिसून येईल.

    धर्माचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे धर्म हा प्रवाही नाही. तसं पाहिलं तर राज्यघटनाही प्रवाही नाही. मुळात नियम हे प्रवाही नसून बंदिस्तचं असल्याने त्यांत अनैसर्गिक असं काही नाही. जुने, कालबाह्य, प्रस्तुत प्रसंगी आचरणात आणता न येणारे नियम गुंडाळून ठेवून त्या जागी नव्या नियमांची रचना वा दुरुस्ती करता येते. हा मार्ग सर्वांना माहिती आहे. परंतु, धर्मरक्षक मात्र या नियमाची अंमलबजावणी कधीच करत नाहीत. यामागील कारण काय असावे ?

    धर्म प्रवाही राहिला असता धर्मसंस्था मानवी समाजाशी संघर्ष न करता शांततामय सहजीवन दीर्घकाळ व्यतीत करू शकते. परंतु हि गोष्ट, वस्तुस्थिती धर्मरक्षक मुळीच लक्षात घेत नाहीत. कारण त्यांना जे कवच लाभले आहे, ते कवच प्रवाहीपणात बिलकुल टिकून राहणार नाही अशी त्यांना भीती आहे व ती रास्त आहे. मुळात बदल हा सृष्टीचा नियम असताना तुम्हांलाच तेवढा न बदलण्याचा अधिकार कसा ? हा प्रश्नचं उपस्थित केला जात नाही. व केला तरी त्याचा आवाज क्षीण असतो. कारण, अशा जीवघेण्या प्रश्नाला देव, संस्कृतीची ढाल बनवून धर्म नेहमीच तोंड देत आला आहे.

    म्हणजेच, खरा धोका नेहमीच धर्मसंस्थेला राहिला असून तिच्या बचावाकरता देव, संस्कृतीचा मुद्दाम वापर केला गेलाय. देव कोणत्याही स्वरूपात माना / न माना. त्याने देवाला काही फरक पडत नाही व तुम्हांलाही. परंतु आम्ही सांगू तोच देव व जसं सांगू तशीच त्याची उपासना करावी असं सांगणारा धर्म असतो.

    जगण्यासाठी खावं हि माणसाची खरी संस्कृती. कोणता पदार्थ कसा --- म्हणजे शिजवून, भाजून, उकडून, तळून खावा हे माणसाचं स्वातंत्र्य. संस्कृती. परंतु आम्ही सांगू तोच पदार्थ, त्याच पद्धतीने खावा अथवा आम्ही ज्याला निषिद्ध मानू ते खाऊचं नये असं सांगणारा धर्म आहे.

    धर्म आपलं सर्व जीवन नियमन करू पाहतो पण आपण धर्माचे नियमन करू शकत नाही. कारण, धर्म हि तशी राजसत्ता आहे व कोणतीही राजसत्ता स्वतःला श्रेष्ठ समजून नेहमीच दुसऱ्यावर वर्चस्व गाजवणं पसंत करते. या वर्चस्ववादी वृत्तीने नेहमीच मूर्खपणाचा --- प्रत्यक्षात हुकुमशाही वृत्तीचा कळस गाठला आहे. मानवी समूहाला सर्वांत मोठा धोका या मानवनिर्मित संस्थेचाचं आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा