बुधवार, १२ जुलै, २०१७

आदर्शवादी विचार, मन पोरकट असतात का ?




    सचिन - सुप्रियाचा एक जुना मराठी चित्रपट आहे, माझा पती करोडपती. त्यात सचिनला एका विधवेशी लग्न करायचं असतं व सुप्रियाला पैशेवाल्याशी. अर्थात हॅप्पी एंडिंगचा ट्रेंड असल्याने दोघांचे हेतू कशा प्रकारे विफल व सफल होतात हे मुळातूनच पाहणं आवश्यक आहे. विशेषतः निळू फुले न् अशोक सराफची जुगलबंदी.पण तो आपला विषय नाही. विषय आहे आदर्शवादाचा.

    माझ्या आठवणीनुसार बहुतेक पुलंच्या ' असा मी असा मी ' मधला नायक, बेंबट्या, असाच आदर्शवादी आहे. फरक इतकाच कि, त्याचा आदर्शवाद संगत बदलेल तसा बदलतो. सामान्यपणे तो सर्वसामान्य भारतीय नागरीकाचं प्रतिक आहे. म्हणजे डाव्यांच्या सभेत त्याला डाव्यांचे विचार पटतात तर उजव्यांच्या सभेत उजव्यांचे. एकप्रकारे त्याला स्वतंत्र मतच नाही. बेंबट्या स्वतः चं मत का बनवू शकत नाही हा स्वतंत्र लेखाचा विषय बनू शकतो परंतु इथे मूळ प्रश्न असा आहे कि, आदर्शवादी कल्पना पोरकट असतात का ?

    एक आठ दहा वर्षांपूर्वी जेव्हा मला स्वतंत्र विचारांची सवय नव्हती, किंबहुना पुलंच्या बेंबट्यावानी मीही मिळेल त्या विचारप्रवाहात शिरून तसाच बनायचा प्रयत्न करायचो. त्याकाळात काही गतजमान्यातील समाजसुधारकांचे विचार वाचून आपणही असंच बनावं असं प्रकर्षानं वाटायचं. दुदैवाने साक्षरता प्रसार, अस्पृश्यता निर्मुलन वगैरे प्रश्न तितके गंभीर राहिले नव्हते. म्हणजे निरक्षरता तशी आजही आहे पण कोणाला शिकवण्याइतकी आपली कुवत नाही. तितके पेशन्सही नाहीत. अस्पृश्यतेचा तर कधी संबंध आला नाही व जेव्हा  आला तेव्हा तिचे स्वरूप बदललले होते. मग राहिली बालविवाह, सतीप्रथा, वपन वगैरे तर तेही निकाली निघालेले. मग सुधारणा करायची तरी काय ? तिही आदर्शवत वाटावी अशी ?

    दरम्यान ( शारीरिक ) वय वाढलं लग्नाची चर्चा सुरु झाली व मनात आलं लग्न केलं तर गरीब, विधवा, घटस्फोटीत किंवा देहविक्रय व्यवसायातून बाहेर पडू इच्छिणाऱ्या तरुणीशी. ( शेवटच्या कल्पनेवर सलमान - नग्माच्या सिनेमाचा प्रभाव होता. बहुटेक बागी ) पण अशा गोष्टी उघड बोलायची त्यावेळी हिंमत नव्हती. बोले तो आपुन एकदम फट्टू ! पण नियतीचा फेरा विचित्र असतो. आयुष्य फिरून अशा वळणावर येऊन ठेपलं कि, लग्नाची सेकंड इनिंग खेळायची म्हटलं तर या ना त्या प्रकारे विभक्त झालेल्या तरुणीशीच करू शकतो. अर्थात हा इछेचा प्रश्न आहे. पण त्यासोबत जोडीला  आणखी एक मुद्दा महत्त्वाचा आहे व तो म्हणजे ज्या व्यक्तीसोबत तुम्हांला जीवन व्यतीत करायचं आहे त्याविषयी विशेष आत्मीयता किंवा प्रेम, कळवला वगैरे नव्हे, वाटत असेल तरच नाद करावा. आदर्शवादी कल्पनांच्या भरीला बळी पडू नये. कारण असले आदर्शवाद बऱ्याचदा अंगाशी येतात व कुटुंबासहित उध्वस्त करून जातात.
              

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा