बुधवार, १६ ऑगस्ट, २०१७

प्रासंगिक (३)

श्रेणी, जाती व वर्णसंस्था या तीन संकल्पनांचा हेतुतः व अज्ञानपूर्वक घोळ करत हिंदू धर्माच्या जातिव्यवस्थेकडे पाहण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु यातील श्रेणी व जाती संस्था परस्परांशी निगडीत असून श्रेणीसंस्थेच्या विघटनानंतरचा पुढचा टप्पा म्हणजे व्यवसायानुसार जातीसमूहांत विभागणी.
आधीच्या काळी विविध व्यवसायांचे संघ होते. एकाच व्यवसायात कौशल्य प्राप्त करण्याची संधी सर्वांना उपलब्ध होती. इथे व्यवसाय संघाचे सदस्यत्व केवळ गुणकर्मावर आधारित होते. परंतु श्रेणीसंस्थांच्या विघटनानंतर यात बदल होत गेला. विघटनावेळी श्रेण्यांची विभागणी व्यवसाय व मुख्य व्यवसायास पूरक अशा उपव्यवसायांनुसार जाती - उपजातींत होत गेली. त्यामुळे पूर्वी ज्या व्यवसायात कोणालाही सहभाग घेण्याचं स्वातंत्र्य होते ते जाऊन इथे आनुवंशिक तत्वावर तो व्यवसाय त्या कुटुंबापुरता -- समुहापुरता मर्यादित झाला. त्याचेच पुढे कालानुरूप विकसित रूप म्हणजे आजची आपली जातीसंस्था. तसेच श्रेणीसंस्थेत सर्वधर्मियांना प्रवेश असल्यामुळे जे अहिंदू होते, ते श्रेणीसंस्थेच्या विघटनानंतर आपापल्या मूळ धर्माचे, वर्णाचे राहिले. बदल फक्त हिंदू समाजरचनेत घडून आला.
परंतु बऱ्याचदा हिंदू धर्मीय व्यक्ती या जातीसंस्थेसोबत वैदिक धर्मीय वर्णसंस्थेची सांगड घालण्याचा प्रयत्न करतात व वैदिकही यांस मान्यता देतात, असे का ?
सर्वप्रथम आपण हे लक्षात घेतले पाहिजे कि, वर्णव्यवस्था हि वैदिक धर्म - समाजजीवनाचा घटक होती. हिंदू धर्म - समाजाचा नव्हे. तसेच वैदिकांची वर्णव्यवस्था हि वैदिक धर्मीय या देशात येण्यापूर्वी वा त्यानंतर अल्पावधीतच संपुष्टात येऊन समस्त वैदिक समाज हा एकवर्णी झाला. वैदिकांच्या या समाजव्यवस्थेचे भ्रष्ट स्वरूप त्यांच्या मनुस्मृतितही आढळून येते. परंतु इथे प्रश्न असा आहे कि, हिंदूंची जातीसंस्था व वैदिकांची वर्णव्यवस्था यांची सांगड कशा प्रकारे व का घालण्यात आली असावी ?
हिंदूंची श्रेणीसंस्था आणि वैदिकांची वर्णव्यवस्था यातील महत्त्वाचं साम्य म्हणजे दोन्हींचे सदस्यत्व जन्माधिष्ठ नसून गुणकर्म तत्वावर आधारित होते. परंतु यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही. जगभरातील प्रत्येक धर्म - समाजात अशा प्रकारची गुणकर्मावर आधारीत असलेली वर्गव्यवस्था अस्तित्वात होतीच. त्यामुळे केवळ या साम्यावरून हिंदू - वैदिक एकधर्मीय होत असा तर्क वा अनुमान काढण्यात काही अर्थ नसला तरी अशा साम्यांचाच आधार घेत अशी रचना करण्यात आली हे उघड आहे, ऐतिहासिक सत्य आहे. परंतु इथे पुन्हा असा प्रश्न उपस्थित होतो कि, अशा बनवेगिरीची गरज का भासावी ?
वैदिक धर्माचा जन्म भारताबाहेरचा असून इथे हा धर्म वैदिकांच्या धर्मप्रसारामुळे जरी पसरला असला तरी देशातील एक मोठा जनसमुदाय प्रत्यक्षरीत्या या धर्माच्या प्रभावाखाली कधीच आला नाही. या देशात ज्याप्रमाणे जैन - बौद्धादी तत्वांची लाट आली तशी वैदिकांची येऊ शकली नाही. परंतु येथील सत्ताधाऱ्यांनी अनेकदा सर्व धर्मांप्रती उदारता दाखवत त्यांना आश्रय दिला. तसेच प्रत्येक राजवटीत, प्रत्येक राजाने कोणत्या ना कोणत्या धर्माचा विशेष पुरस्कारही केला. परिणामी अशी राजवट त्या त्या धर्माचा उत्कर्ष, उज्ज्वल काळ म्हणून ओळखली जाते. जसे सम्राट अशोकमुळे मौर्यघराणे व बौद्ध धर्म. याचप्रकारे गुप्त राजवटीत वैदिकांचा प्रकार घडून आला.
प्राचीन भारताच्या इतिहासापासून ते अगदी मध्ययुगाच्या अंतापर्यंत इथे अनेक पराक्रमी हिंदू राजे झाले. कित्येक साम्राज्यं स्थापन झाली, अस्त पावली. मग एकट्या गुप्त सम्राटांच्या कारकिर्दीत असं काय विशेष घडलं कि, त्या काळास सुवर्णयुगाचे नाव प्राप्त झाले ? गुप्त साम्राज्याआधी इथे मौर्य, सातवाहनांची प्रदीर्घ काळ राजवट होती. गुप्त सम्राटांना समकालीन वा नंतर चालुक्य, परमार, राष्ट्रकुट, विजयनगर इ. सत्ता उदयास येऊन अस्त पावल्या. यांचा समावेश सुवर्णयुगात का होत नाही ? तसेच गुप्त काळात जर हिंदू समाजाचा खरोखरच विकास झाला होता तर त्यानंतर या समाजाची अवनती का व्हावी ? मुस्लिम आक्रमण हे याचं उत्तर होऊ शकत नाही. कारण गुप्त राजवटीच्या काळात इस्लामचा मुळी जन्मच झालेला नव्हता व मुस्लीम आक्रमण हिंदुस्थानच्या काळजाप्रत पोहोचण्यास बारावं शतक उजडावं लागलं. याचा अर्थ साहजिकच असा होतो कि, हिंदू समाजाची अवनती त्यापूर्वीच झालेली होती. मग गुप्तकाळ हा उत्कर्षाचा मानावा कि अपकर्षाचा ?
पुराण ग्रंथ हे हिंदू धर्माचे व इतिहासाचे एक साधन मानले जाते. या पुराणा ग्रंथांचे लेखन - पुनर्लेखन गुप्तकाळात मोठ्या प्रमाणावर झाल्याचे सर्वमान्य आहे व या हिंदू पुराणांवर वैदिक आवरणं चढवल्याचेही आता स्पष्ट होऊ लागलं आहे. परंतु इथं पुन्हा प्रश्न उपस्थित होतो कि, अशा बनावटगिरीची वैदिकांना गरज का पडावी ?
वैदिकांना त्यांचा धर्म, धर्मग्रंथ अलग असल्याचे माहिती होते. तरीही त्यांनी दोन धर्माचं एकीकरण करत आपलं वर्चस्व अबाधित राखण्याचा प्रयत्न का केला असावा ?
वैदिक धर्माचा इथे मिशनरी पद्धतीने प्रसार झाला. परंतु कोणत्याही धर्मांतरित समाजात ज्या समस्या निर्माण होतात तशा या वैदिक धर्मात प्रवेशलेल्यांच्या बाबतीतही झाल्या. याच धर्मांतरीत वैदिकांनी पुराणांच्या लेखन - पुनर्लेखन कामात श्रेणी ते जाती हा क्रम वर्ण - जाती असा करून दोन धर्मांचा व आपल्या पूर्वेतिहासाचा धागा जुळवण्याचा मर्यादित यशस्वी प्रयत्न केला. मर्यादित यासाठी कि, हे दोन धर्म कधीच एकजीव होऊ शकले नाहीत व यशस्वी याकरता कि, हिंदूंनी जातीसंस्थेचा उगम वर्णसंस्थेतून झाला यावर आपली श्रद्धा ठेवली. विशेष महत्त्वाचे म्हणजे वैदिकांनी ज्याप्रमाणे वर्णव्यवस्थेची सुस्पष्ट व्याख्या करून ठेवली तशी जातीसंस्थेची कधीच केलेली नाही.
इथे हि बाब आपण लक्षात घेणे अत्यावश्यक आहे व ती म्हणजे आपण ज्या काळाचा विचार करत आहोत, त्या काळात लिखित सामग्री अत्यंत मर्यादित स्वरूपात उपलब्ध असून बव्हंशी पूर्वेतिहास हा ऐकीव स्वरूपाचा / मौखिक परंपरेने जपलेला होता व या स्थितीत ब्रिटीश राजवट येथे स्थिर होईपर्यंत फारसा फरक पडला नाही. तसेच या काळात ग्रंथांचे जे काही लेखन होई त्यामध्ये एका ग्रंथाच्या त्याच गावातील वा आसपासच्या गावातील हस्तलिखित प्रतींत तफावत होत असे. उदा :- शिवकालीन बखरी.
अशा तफावातींमुळे आपल्या पुराण ग्रंथांत कधीच एकवाक्यता दिसून येत नाही. परंतु हा धर्मांतरीत वैदिकांविषयीचा मुद्दा झाला. मूळ तसेच कट्टर वैदिक धर्मियांनी या बाबी कशा खपवून घेतल्या ? हा प्रश्न उरतोच.
वैदिक धर्मात प्रवेशलेल्या हिंदूंनी आपल्या सर्वच पुरातन चाली - रिती, परंपरा, संस्कार त्यागले नाहीत. तेव्हा अशा पधर्मांतरीतांमुळे आपल्या धर्माचे मूळ स्वरुप लोपून ते विकृत वा भ्रष्ट होऊ नये म्हणून मूळच्या वैदिकांनी आपल्या स्मृतिग्रंथांत अशा धर्मांतरीतांना चाप लावण्यासाठी अनेक बंधने लाग्डली. वैदिक स्मृतितील श्लोकांत जो विरोधाभास, घालघुसड आढळून येते, त्यामागे हे देखील एक कारण आहे.
वैदिक धर्मियांना आपला धर्म हिंदू धर्माहून स्वतन्त्र असल्याचे व हा धर्म हिंदुस्थान बाहेरचा असल्याचे चांगलेच माहित होते व आहे. तरी त्यांनी आपल्या धर्मबांधवांनी वैदिक धर्माची हिंदू धर्मासोबत सांगड घालण्याचा जो प्रयत्न चालवला होता, तो न थांबवता उलट त्यास हातभारच लावला. कारण धर्मसत्ता हि कधीही राजसत्तेविना उभी राहू शकत नाही व वैदिक धर्माचे स्वरूप तसेच प्रसार व्याप्ती पाहता तिला अशी राजसत्ता प्राप्त होणे वा गुप्त काळाप्रमाणे कायमस्वरूपी राजाश्रय मिळणेही शक्य नव्हते. तेव्हा जे चाललं आहे ते भल्यासाठीच म्हणत त्यांनीही या बनवाबनवीत सहभाग घेतला.
वैदिकांची हिंदू धर्मातील घुसखोरी इतक्यावरच थांबली नाही तर त्यांनी हिंदू धर्मावर वैदिकत्वाचं कलम करत हरेक बाबतीत श्रेष्ठ स्थान वैदिक धर्म, ग्रंथांना मिळवून देण्याचा यत्न केला. वैदिक देवतांचे प्रस्थ माजवण्याचा प्रयत्न केला. याकरता येथील प्रचलित, प्रस्थापित दैवतांना आहे त्या स्थानावरून खाली खेचण्याचे वा त्यांचे मूळ स्वरूप लोपून त्यांस वैदीकत्वाचं आवरण चढवण्याचे प्रयत्न केले. उदाहरणार्थ, वैदिक रुद्र व हिंदू शिव यांची त्यांनी सांगड घातली. हिंदू धर्मातील शैव परंपरेला मोडीत काढण्यासाठी वैष्णव परंपरा निर्माण करून वर हिंदूंची तांत्रिक पूजा बदनाम करून टाकली. कित्येक शैव स्थळे वैष्णव म्हणून ताब्यात घेतली. उदा :- पंढरपूर, तिरुपती इ.
वैदिकांचा श्रेष्ठत्वाचा सोस इतका वाढला कि, प्रत्येक थोर, पराक्रमी हिंदू राजामागे त्यांनी या ना त्या मार्गाने खरीखोटी वैदिक पात्रं मार्गदर्शक रूपाने घुसवली. उदा :- मौर्य संस्थापक चंद्रगुप्ताचे कुलशील माहिती नसते पण चाणक्याची गोत्रासहित माहिती उपलब्ध असते. तीच बाब शिवाजीच्या इतिहासाची.
वैदिकांच्या या धार्मिक - राजकीय इतिहास क्षेत्रातील घुसखोरीने येथील हिंदू समाजमन आपल्याच पूर्वेतिहासात गोंधळून जाऊन आपल्या मुळांचा शोध वैदिक धर्मसाहित्याच्या आधारे घेऊ लागले, घेत आहे.
कोणी म्हणेल कि, हिंदू - वैदिक हे इतिहासात वेगळे असतील परंतु सध्या तरी एकजीव, एकत्र आहेत ना ? तर, तसं अजिबात नाही. उदा :- सावरकर सारख्यांनाही सहा सोनेरी पाने लिहिताना हिंदुत्वाचा जप करत मधेच आपलं वैदिक महात्म्य घुसवण्याचा मोह आवरला नाही. बरं, हि गेल्या शतकातील बाब मानावी तर चालू शतकात, देशाच्या केंद्र सत्तेत बसलेला राजकीय पक्ष हिंदुत्वाचा गजर करत मधेच वैदिक राग का आळवत असतो ?
यावरून वैदिकांच्या भाषेतच बोलायचं झालं तर, ज्याप्रमाणे मुसलमान जसं आपलं मुस्लीमत्व विसरू शकत नाही तद्वत वैदिकही आपलं वैदिकत्व क्षणभरही नजरेआड करू शकत नाहीत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा