गेले काही दिवस श्री. चां. भ. खैरमोडे लिखित डॉ. भीमराव रामजी आंबेडकर चरित्र ग्रंथ, खंड ६ वाचत होतो. या खंडामध्ये डॉक्टरांची धर्मांतर घोषणा व त्यावर इतरांच्या प्रतिक्रिया तसेच तत्कालीन राजकीय, सामाजिक स्थितीची माहिती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, यात विरोधी मताचा प्रामुख्याने समावेश करण्यात आला आहे, जे सहजासहजी इतर चरित्रग्रंथांत होत नाही.
दि. १३ ऑक्टोबर १९३५ रोजी येवला येथे डॉक्टरांनी धर्मांतराची घोषणा केली. तत्पूर्वी हिंदू समाजातून अस्पृश्यता नष्ट व्हावी आणि अस्पृश्यांना स्पृश्यांच्या बरोबरीने दर्जा मिळावा याकरता प्रातिनिधिक स्वरूपाची महाड चवदार तळे तसेच नाशिक काळाराम मंदिर सत्याग्रह हाती घेण्यात आले होते. पैकी महाडच्या सत्याग्रहास संमिश्र प्रतिसाद लाभला तर नाशिकचा लढा रेंगाळत चालला. दरम्यान मनुस्मृती दहनाचा कार्यक्रमही उरकून झाला. अस्पृश्यांना हिंदूंपासून वेगळे करण्याची ब्रिटिश सरकारची चाल हाणून पाडण्यासाठी म. गांधींनी उपोषणाचा मार्ग पत्करून डॉ. आंबेडकरांना स्वतंत्र मतदारसंघाऐवजी राखीव जागांवर राजी करण्यात पुणे कराराद्वारे यश मिळवले.
या महत्वाच्या काही घटनांच्या पार्श्वभूमीवर डॉक्टरांच्या धर्मांतर घोषणेची, खैरमोडे लिखित आंबेडकर चरित्र सहाव्या खंडातील माहिती प्रामुख्याने जमेस धरून पाहिल्यास आपणांस दिसून येते :-
१) हिंदूंमधील अस्पृश्यता नष्ट व्हावी व त्यासोबत जातीभेद संपुष्टात यावा याकरता इतर समाजसुधारकांप्रमाणेच डॉ. आंबेडकरही प्रयत्न करत होते.
२) अस्पृश्यता आणि जातिभेदामुळे हिंदू समाज – पर्यायाने राष्ट्राची झालेली हानी त्यांना दिसत होती व वारंवार याचे दाखले आंबेडकरांनी आपल्या लेखन - भाषणांत दिले आहेत.
३) परंतु अस्पृश्यता आणि जातीभेद यांमुळे आपणांस सामाजिक, राजकीय धोका आहे याची जाणीव हिंदू समुदयास होत नव्हती. (आणि आताही ती पूर्णार्थाने झाली आहे, असे म्हणवत नाही. )
४) या कामात अडथळे निर्माण करण्याचे काम स्वयंघोषित हिंदू नेते तथा हिंदुत्ववादी मंडळी करत होती. तर धार्मिक क्षेत्रांत शास्त्रार्थ सांगणारे ब्राह्मण तथा वैदिक पंडित.
५) वस्तुस्थिती पाहिली असता या हिंदुत्ववाद्यांचा तसेच शास्त्री पंडितांचा धर्म वैदिक. त्यांचे हिंदू धर्माशी काही देणे घेणे नाही. परंतु हिंदूंनी मुर्खपणाने वैदिकांचे धार्मिक क्षेत्रात पुढारपण स्वीकारल्याने आपोआप राजकीय व सामाजिक क्षेत्रातही हिंदूंवर वर्चस्व स्थापण्याची संधी वैदिकांना लाभली व ती त्यांनी हिंदुत्ववादाच्या नावाखाली साधली.
६) त्यामुळेच ही हिंदुत्ववादी मंडळी एकीकडे डॉक्टरांना धर्मांतर न करण्याचे, सबुरीने घेण्याचे आवाहन करत असताना दुसरीकडे धर्मांतर केल्यास इस्लाम व ख्रिस्ती धर्म न स्वीकारण्याची सूचना करताना दिसतात. यामागील त्यांचा उद्देश साफ आहे.
७) हा तोच काळ आहे, ज्यावेळी द्विराष्ट्रवादाची सैद्धांतिक मांडणी होऊ लागली होती. अशा स्थितीत हिंदूंमधील एक मोठा समुदाय – एकगठ्ठा नसला तरी बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात धर्मांतरित झाल्यास तुलनेने हिंदू कमकुवत होऊन – अस्पृश्य ज्या धर्मात प्रवेशतील तो धर्म सबळ भीती म. गांधीदी नेत्यांना दिसत होती. त्याउलट हिंदुत्ववादी तथा वैदिक नेत्यांना हिंदू समुदाय जितका कमकुवत होईल तितके आपले त्यावर वर्चस्व स्थापणे आणि बळकट करणे सोयीचे होईल असे वाटत होते. ( आजदेखील हिंदुत्ववादी तथा वैदिक मंडळींची हीच भूमिका कायम असल्याचे दिसून येते. )
८) यामुळेच अस्पृश्यांचे धर्मांतर हे केवळ सामाजिकच नव्हे तर राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे बनले होते.
९) डॉ. आंबेडकरांच्या दृष्टीने हा अत्यंत बिकट काळ मानला पाहिजे. एकीकडे सामाजिक बांधिलकी अस्पृश्य समुदायासोबत. दुसरीकडे राष्ट्राचे भवितव्य तर तिसरीकडे कौटुंबिक जीवन.
इथे वादाकरता म्हणून मुद्दा उपस्थित होऊ शकतो कि, तेव्हाच्या सर्वच राजकीय - सामाजिक नेत्यांसमोर आंबेडकरांसारखेच प्रश्न वा समस्या उभ्या होत्या. परंतु आंबेडकर आणि इतरांच्या बाबतीत असलेला मूलभूत फरक म्हणजे — आंतरराष्ट्रीय पातळीवर अस्पृश्य समुदायाचे दुःख आणि वेदना मांडणारा तो एकमेव नेता होता. त्याच्या पश्चात हा लढा पुढे नेणारे व तो यशस्वी करणारे आश्वासक नेतृत्व जवळपास नव्हतेच. ( आणि तसे ते लाभले नाही, हे एक वैश्विक सत्य आहे. )
यामुळे मिळालेल्या प्रत्येक संधीचा समाज आणि राष्ट्र, या दोहोंना जास्तीतजास्त लाभ व्हावा याकरता आंबेडकर प्रयत्नशील होते.
१०) यातूनच धर्मांतराकरता त्यांनी शीख धर्माची निवड केली. जेणेकरून अस्पृश्य समाज हिंदू संस्कृतीच्या कक्षेबाहेर जाऊ नये. ( प्रकरण ८, मुंजे - आंबेडकर पत्रव्यवहार, आंबेडकरांचे निवेदन )
परंतु काही काळाने त्यांनी शीख धर्म स्वीकारण्याचे रद्द केले. त्याची कारणे या खंडात स्पष्ट झालेली नाहीत.
११) आंबेडकरांची धर्मासंबंधी अपेक्षा आणि भूमिका काय होती ? याचा संक्षेपात विचार करायचा झाल्यास — “माणूस धर्माकरिता नाही, धर्म माणसाकरिता आहे” **
हे त्यांचे उद्गार त्यांची धर्मविषयक भावना स्पष्ट करण्यास, माझ्या मते पुरेसे आहेत. तसेच त्यांना मनुष्याच्या सर्वांगीण विकास तथा प्रगतीकरता स्वातंत्र्य, समता, बंधुता या तत्वांवर आधारित धर्म हवा होता. ( याच तीन मुख्य तत्वांचा पुढे राज्यघटेनच्या प्रास्ताविकात समावेश करण्यात आला, ज्यास वैदिक संघाचा विरोध आहे. )
** ( प्रकरण ४, दि. १३ मे १९३६ रोजीचे मुंबईतील भाषण. —- मात्र लेखकाने वा इतर कारणांनी दिलेली तारीख चुकीची वाटते. कारण दि. ३० मे ते २ जून १९३६ हे चार दिवस नायगाव भागात अखिल मुंबई इलाखा महार परिषद झाली. ज्यामध्ये बाबासाहेबांनी केलेल्या भाषणात उपरोक्त उद्गार काढले असून सदर भाषण मुक्ति कोण पथे या पुस्तिकारूपाने प्रसिद्ध झाल्याचे समजते. )
१२) धर्मांतराने आपले सर्व प्रश्न सुटतील अशी आंबेडकरांची भूमिका नव्हती, तसेच अशा प्रकारचे आश्वासन त्यांनी केव्हाही आपल्या अनुयायांना दिले नाही. उलट धर्मांतर केल्यानंतरही आपणांस आपल्या हक्कांकरिता लढा द्यावा लागेल, संघर्ष करावा लागेल याची ते त्यांना सदोदित जाणीव करून देत होते.
१३) धर्मांतर केल्यानंतरही संघर्ष करावा लागणार असेल तर धर्मांतर कशासाठी ? असा प्रश्न उद्भवू शकतो, ज्याची मीमांसा अगदी थोडक्यात अशी देता येईल की :- तत्कालीन हिंदूंचे नेते – ज्यामध्ये गांधींसह हिंदुत्ववादी देखील आहेत – स्पृश्य हिंदूंना, अस्पृश्यता त्याग, जातीभेद मूलतः निर्मूलनास प्रवृत्त करण्यास समर्थ होते का ? म. गांधी लेखी व भाषणांत कितीही शब्दभ्रम निर्माण करोत, परंतु व्यवहारतः अशी स्थिती उत्पन्न होणे, नजीकच्या तसेच दूरच्या काळातही अशक्य असल्याचे जाणून होते.
हिंदुत्ववादी तथा वैदिक नेत्यांना याचे उत्तर नकारार्थी असल्याचे माहितीच होते. मग जर सकल हिंदू स्पृश्य समुदाय अस्पृश्यता व जातीभेद पालन समूळ निर्मूलनास सिद्ध होणे शक्य नाही, तर मग अस्पृश्यांनी धर्मांतर करू नये असे म्हणण्याचा प्रश्न येतोच कुठे !
१४) हिंदू धर्म आणि डॉ. आंबेडकरांची भूमिका.
सध्याच्या काळात बाबासाहेबांची प्रतिमा, ही हिंदुधर्मविरोधी अशी रंगवली जाते, परंतु त्यात तथ्य नसल्याचे आपणांस अभ्यासाअंती आढळून येते. आंबेडकरांनी आपल्या हयातीत हिंदुधर्मावर पुष्कळ टीका केली हे मान्य. तशी ती इतरांनीही केली. परंतु प्रस्तुत लेखाच्या कलम ११ मधील “माणूस धर्माकरिता नाही, धर्म माणसाकरिता आहे” हे त्यांचे उद्गार, त्यांची धर्मविषयक भूमिका स्पष्ट करणारे आहेत.
ज्या धर्मग्रंथांमध्ये मनुष्याला काल्पनिक बाबींवरून ( इथे जातीभेद, अस्पृश्यता अभिप्रेत आहे ) हीन वागणून देण्याचे नियम नमूद करण्यात आले आहेत, तो धर्मग्रंथ नाकारून, प्रसंगी त्याचे दहन करण्याचे धारिष्ट्य फक्त ही एकच व्यक्ती दाखवू शकली. तसेच तत्कालीन सुधारकांप्रमाणे आधी टीका करा व प्रसंग पडल्यावर माफी मागणे किंवा उक्ती आणि कृती यांत त्यांनी भेद दर्शवला नाही.
डॉक्टरांनी स. १९३५ मध्ये धर्मांतराची घोषणा केली. प्रत्यक्ष धर्मांतर स. १९५६ मध्ये झाले. या जवळपास दोन दशकांच्या अवधीत हिंदू समाजमनास सुधारणेकरता बराच वाव होता. परंतु या समुदायाने फाळणी सारखे भीषण वास्तव्य समोर असतानाही आपला हेका सोडण्यास नकार दिला ही वस्तुस्थिती आपणांस दुर्लक्षित करून चालणार नाही. फाळणीनंतरही स्वतंत्र भारतात कायदेमंत्री म्हणून आंबेडकरांनी हिंदू कोड बिल सारख्या कायद्याचा मसुदा बनवून आपले सुधारकी कार्य सुरूच ठेवले. परंतु या कार्याची ओळख समाजाला तेव्हा न् आत्ताही, व्हावी तशी झाली नाही. असो. लेखाचा समारोप करताना एका बाबीचा निर्देश करणे मी आवश्यक समजतो व ती म्हणजे…. आज जे काही हिंदू सहित सर्व धर्मीय समाजसुधारक आपले कार्य निर्भीडपणे करू शकतात, त्याचे श्रेय या महान मूर्तीभंजकास आहे !**
** मूर्तीभंजक हा शब्द येथे रूढी, परंपरा इ. निर्मूलक याअर्थी योजला आहे.
प्रमुख संदर्भ ग्रंथ :-
१) डॉ. भीमराव रामजी आंबेडकर चरित्र ग्रंथ, खंड ६ :- श्री. चां. भ. खैरमोडे